ग्राफिटी "१० मिनिटाच्या' पानात हवी
नित्यनेमाने अधिकाधिक नावीन्यपूर्ण वाटणारे आपले गोमन्तक वर्तमानपत्र खरोखरच १० मिनिटात गोमन्तक या शीर्षकाला पात्र ठरले आहे. आम्ही गृहिणी खास करून किमान सकाळी घरातून बाहेर निघण्यापूर्वी तेवढा भाग वाचून संपूर्ण गोमन्तकाचा मजकूर डोळ्यासमोर आणतो. सायंकाळी मात्र संपूर्ण गोमन्तक वाचला जातो. याबाबत एक नम्र सूचना आहे की आपल्या वर्तमानपत्रातील "ग्राफिटी' हा भन्नाट प्रकार जर त्या ""१० मिनिटात' या पानात घालता आला तर बरे होईल. त्यामुळे "ग्राफिटी' करता लागणारा फक्त अर्धा मिनिटाचा अवधी संपूर्ण दिवसभर व्यक्तीला ताजेतवाने ठेवतो. नाहीतर "ग्राफिटी' कोणत्या पानात आहे ते शोधण्यात एक मिनीट जातेच. त्यापेक्षा आम्हा "ग्राफिटी' वेड्यांसाठी एवढे करावे ही विनंती.
सौ. सुषमा सुनील नाईक, पणजी
-----------
वाहन वेगावर नियंत्रण हवे
मंगळवार, दि.१३ च्या दै. गोमन्तकमधील "आजच्या जगात सर्वात स्वस्त झालेली गोष्ट म्हणजे मरण' या ग्राफिटी ने लक्ष वेधून घेतले. बराच वेळ डोळे तिथेच स्थिरावले. खरेच, आजच्या काळात सगळ्यात स्वस्त काय झालेले असेल तर ते मरण! एकही दिवस असा उजाडला नसेल की ज्या दिवशी मृत्यूची बातमी टीव्हीवर, वर्तमानपत्रातून किंवा अन्य मार्गाने आपल्या कानावर आलेली नसेल. निसर्गनियमाप्रमाणे वार्धक्याने गंजलेल्या वृद्धांना आलेल्या मरणाचा आपण स्वीकार करू शकतो. इथे अवश्य नमूद करावेसे वाटते की ते वृद्ध जरी असले तरी कुटुंबातील लोकांना ते प्रिय असतातच. तरी पण कालचक्राप्रमाणे त्यात अघटित असे काहीच नसते. पण आयुष्य आनंदाने जगण्याच्या वयातील माणसांच्या अपघाती मृत्यूबद्दल ऐकण्यात आले की मनाला अत्यंत हळहळ वाटते, मन बेचैन होऊन जाते. गोव्यात आजकाल वाहनांच्यापायी जे असंख्य अपघाती मृत्यू आठवतात त्याबद्दल आपण सर्वस्वी सरकारलाच जबाबदार धरू शकत नाही. निःसंशय सरकारने आपली बाजू योग्यपणे सांभाळायला हवीच. वाहनचालकाचीही तेवढीच किंबहुना जास्तीत जबाबदारी असते. तुमची एक माता किंवा भगिनी असे मानून तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे की आपले वाहन चालविताना संपूर्ण लक्ष वाहनावरच केंद्रित करा. मन कधीच विचलित होऊ देऊ नका. मद्यप्राशन केल्यास वाहन चालवू नका आणि मुख्य म्हणजे वेगावर नेहमीच नियंत्रण ठेवा. स्वतःच्या आयुष्याचा जरूर विचार करा. तुमच्या कुटुंबात तुम्ही किती प्रिय आहात हे ध्यानात ठेवा अन् त्याचप्रमाणे तुमच्या समोरून येणारेही इतरांचे परमप्रिय आहेत हे सुद्धा जाणीवपूर्वक लक्षात असू द्या. जाणारा जातो, पण मागे ठेवणाऱ्यांना मरणप्राय यातना भोगायला लावतो.
- शरद भा. करमली, माधेगाळ, काकोडा.
Thursday, May 22, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
तुमचा ब्लॉग झकास आहे. मी मधूनमधून तुमच्या ब्लॉगवर येत असतो. मी तुमचा ब्लॉग माझ्या या पोस्टमधे जोडला आहे. "ब्लॉग" या विषयावर मी एक पोस्ट लिहीली आहे. तरी एकदा नजर टाकावी.
शुभेच्छा !
Post a Comment