ग्राफिटी'तील मजकूर निषेधार्ह
ता. 26 नोव्हेंबरची "ग्राफिटी' वाचली. पुरुषांच्या दृष्टिकोनातून स्त्री हा नेहमीच विनोदाचा विषय ठरली आहे, सगळ्यांना हे माहितीही आहे. खासगीत ते सहजपणाने घेतलेही जाते. (स्त्रियांना सिस्थ सेन्स असल्यामुळेच असेल.) पण "सकाळ'सारख्या वृत्तपत्रात अशा प्रकारे एकूणच स्त्रियांबद्दल असा मजकूर प्रसिद्ध व्हावा? तरी सध्या स्त्री वेळोवेळी व ठिकठिकाणी स्वतसिद्ध करत असताना अशा प्रकारची "ग्राफिटी' सकाळमध्ये प्रसिद्ध होते, हे एक स्त्री म्हणून आम्हाला निषेधार्ह वाटते. केवळ निषेधार्ह नव्हे, तर अपमानकारक वाटते. आज जगात वावरताना आजूबाजूला "सिस्थ'च काय अजिबात कुठलाच सेन्स नसलेले पुरुष हरघडी, हरक्षणी दिसतात; मग त्यांच्याबद्दल काय? तरीही पुरुषांबद्दलही असे छापून यावे, असे आमचे अजिबात म्हणणे नाही. (प्रसिद्ध होणारा मजकूर कुणालाच अपमानकारक नसावा, हा हेतू; सिस्थ सेन्स' म्हणा हवा तर).
- शैलजा पटवर्धन, अंजली सातपुते, अनुश्री लिमये.
`सकाळ`, ता. २८.११.२००७
-----------------------------------
कॉमेंट नव्हे कॉम्प्लिमेंट!
"बायकांकडे सिक्स्थ सेन्स असतो म्हणे; पहिल्या पाचांबद्दल बोलायचं नाही' या "ग्राफिटी'चा मी घेतलेला अर्थ असा ः स्त्री-पुरुष सर्वांना असणारे आधीचे सामान्य पाच सेन्स तर स्त्रीला आहेतच, त्याबद्दल बोलायचेच नाही; पण एक विशेष असा सहावा सेन्सही आहे जो बिच्चाऱ्या पुरुषांना नाही. आजची स्त्री ही शिक्षित, समाजातल्या वेगवेगळ्या थरांत वावरणारी, अनेक जबाबदाऱ्या लीलया पेलणारी, सुजाण आहे. अशा सहज विधानांनी अपमानित होण्याइतकी हलक्या मनाची ती निश्चितच नाही. कोणी जर अशी "कॉमेंट' केली तर ती "कॉम्प्लिमेंट'मध्ये बदलून घेण्याचा सिक्स्थ सेन्स तिच्यात असलाच पाहिजे.
- इंद्रायणी चव्हाण
-----------------
हा शब्दांचा खेळ...
आजपर्यंत वेगवेगळ्या नात्यांवर, घटनांवर अतिशय मार्मिक टिप्पणी करणारी "ग्राफिटी' आपण वाचत आलोय. त्यामध्ये कोणालाही दुखवण्याचा हेतू कधीच जाणवला नाही. हा शब्दांचा खेळ आहे. या खेळाची मजा घ्यायची की रडीचा डाव खेळायचा हे वाचकाला विनोदाचा "सेन्स' किती आहे यावर अवलंबून आहे.
- सुनीता कुलकर्णी
`सकाळ`, ता. ०८.१२.२००७
Monday, December 10, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment