Tuesday, October 2, 2007

ग्राफिटी नगरच्या भेटीला...

नगरकरांचे हास्य फुलवत प्रत्यक्ष अवतरली "ग्राफिटी'
नगर, ता. 1 ः "सावधान... पुढे चांगला रस्ता आहे...' "मुलगा आणि नारळ कसा निघेल, हे आधीच सांगता येणं अवघड आहे...' "आयुष्यात चार माणसं तरी जोडावीत, "शेवटी' उपयोगाला येतात...' अशा अफलातून, कळीच्या वाक्‍यरचना सादर होत होत्या. रसिकहृदयात स्थान मिळवणारी "ग्राफिटी' प्रत्यक्ष अवतरत होती... अन्‌ त्याबरोबर उसळत होती हास्याची कारंजी. मिळत होती टाळ्यांची उत्स्फूर्त दाद!येथील उदय एजन्सीतर्फे सांस्कृतिक क्षेत्रातील सृजनशील व्यक्तित्त्वांशी "उदय-संवाद' ही गप्पांची मालिका सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत "ग्राफिटी आपल्या भेटीला' ही पहिली मैफल येथील रावसाहेब पटवर्धन सभागृहात झाली. "सकाळ'मधून लोकप्रिय झालेल्या "ग्राफिटी' सदराचे लेखक-संकलक अभिजित पेंढारकर व अक्षररचनाकार प्रभाकर भोसले यांच्याशी "सकाळ'चे ज्येष्ठ उपसंपादक अभय न. जोशी यांनी संवाद साधला. प्रमुख पाहुणे म्हणून "सकाळ'चे मुख्य बातमीदार बाळ ज. बोठे उपस्थित होते.

"ग्राफिटी' म्हणजे नेमकं काय, तिचा जन्म कसा झाला, वाचकांच्या कशा प्रतिक्रिया मिळाल्या, पुस्तकाचे कसे स्वागत झाले, काही "ग्राफिटी' कशा सुचल्या... अशा रसिकांच्या मनातील उत्सुक प्रश्‍नांची उत्तरे पेंढारकर अन्‌ भोसले यांनी दिलखुलासपणे दिली. त्यामुळे ही संवाद मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. "ग्राफिटी' म्हणजे कुठल्याही मोकळ्या जागेवर भावना व्यक्त करण्याची कला.

युरोपीय देशांत तिचा जन्म झाला, अशी रंजक माहिती पुरवत पेंढारकर यांनी निवडक "ग्राफिटीं'चे वाचन केले. भोसले यांनी निवडक "ग्राफिटीं'चं अक्षरलेखनाचं प्रात्यक्षिक सादर करून दाद मिळवली. उपस्थित रसिकांनीही "ग्राफिटी'कारांशी संवाद साधला. उदय एजन्सीचे संचालक वाल्मीक कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात "उदयसंवाद'विषयी माहिती दिली, तसेच संस्थेच्या आतापर्यंतच्या उपक्रमांचा आढावा घेतला. श्री. बोठे यांनी मनोगत व्यक्त केले. सरिता कुलकर्णी यांनी आभार मानले. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अनुजा कुलकर्णी यांनी पसायदान सादर केले.
---
सावधान... पुढे चांगला रस्ता आहे!
श्री. पेंढारकर यांनी मैफलीच्या सुरवातीलाच स्पष्ट केले, की पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवर आम्ही "सावधान, पुढे चांगला रस्ता आहे' ही "ग्राफिटी' लिहिली होती. मात्र, नगरचे रस्ते पाहून पुणेकरांचा त्रास फारच सुसह्य असल्याचे जाणवले. श्री. भोसले यांनी हीच ग्राफिटी अक्षरलेखनातून सादर केल्यानंतर रसिकांची भरभरून दाद मिळाली. नगरच्या महापालिकेत ती लावावी, अशी उत्स्फूर्त सूचनाही आली. .........................................................

2 comments:

Dr. Shriniwas Deshpande said...

आपणास आपल्या आईने लहानपणी कोणते बालकडू पाजले होते ?

priyadarshan said...

मस्त लेख