Wednesday, August 29, 2007

सलाम ग्राफिटी!

सलाम ग्राफिटी!

"सकाळ'ची प्रत्येक ग्राफिटी गहिरे रंग घेऊनच भेटीला येत असते. कधी उपहास तर कधी विरोधाभास, कधी रेशीमचिमटा तर कधी जाणवण्याएवढा धक्का. कधी समाजजीवनावर मार्मिक टिप्पणी करता करता वर्मावर नेमके बोट ठेवणारी, तर कधी मानवी प्रवृत्तीची अचूक नाडी ओळखणारी. कधी विनोदाचा शिडकावा, तर कधी ढोंगीपणावर प्रहार करणारी. वाचकाचे बोट धरून अलवार पावलांनी चालायला लावणारी, तर कधी चालता चालता पायाखालची वाटच काढून घेणारी. बोचरी, गंभीर, मिस्कील, खोडकर ही तिची रूपं विलोभनीय वाटतात. मोजक्‍याच शब्दांतून वैचारिक व भावनिक कल्लोळ निर्माण करत, शाश्‍वत सत्याला स्पर्श करत वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या ग्राफिटीला सलाम!

- प्रा. वामन बोरकर, पुणे.

Friday, August 24, 2007

हे गोयंच्या भूमीचं...


ग्राफिटी - एक डोकेबाज साहित्यिक नवलाई


अलीकडेच सुरू झालेला ग्राफिटी हा इंग्रजी नावाने इंग्रजाळलेला पण पूर्णपणे मराठी मिश्‍किलीने खुदकन चेहऱ्यावर हास्य आणणारा व विचार करायला लावणारा नावीन्यपूर्ण प्रकार रोजच्या वृत्तपत्र वाचनात टोलवाटोलवी किंवा चिंटू या छोट्यांची मोठ्यांनी चालवलेल्या व्यंगचित्रमालिकेसारखाच. वाईट बातम्या वाचून मनावर आलेले चिंतेचे सावट, दूर करून जातो. ग्राफिटीच्या खाली लेखक/लेखिका किंवा संयोजकाचे नाव नसते. मग ग्राफिटीचे जनकत्व कुणाकडे द्यायचे? सुरवातीला मात्र एक स्त्रीलिंगी नाव असायचे. तेव्हाची एक सुंदर आठवणीत राहिलेली ग्राफिटी अशी होती. "मी मित्राबरोबर पळून गेल्यावर आईबाबांनी पहिली गोष्ट केली म्हणजे माझी खोली भाड्याने दिली.' अशा या मार्मिक, मिश्‍कील, सत्याचे दर्शन घडविण्याच्या ग्राफिटी या साहित्यप्रकाराचा शोध कुणी लावला, नेहमीचा रतीब कोण घालतो, त्या शब्दांना सजवतो कोण याची माहिती वाचकांना दिल्यास वाचकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळेल असे वाटते. संपादकांनी वाचकांपुढे हे दालन खुले करावे.


- ग. ना. कापडी पर्वरी

हे तात्यासाहेबांच्या नाशकाचं..


"ग्राफिटी'ची शब्दखेळी भावते

"सकाळ'मधून प्रसन्न पानावरील प्रसन्न करणारी, प्रसंगी जळजळीत सत्य मांडणारी ग्राफिटी रोज वाचतोय. आता तर "सकाळ' हातात घेताच घरातील लहान- थोर मंडळी ग्राफिटी वाचून मनास "रिचार्ज करून घेतात आणि त्यानंतर बातम्या वाचण्यास सुरवात करतात. खरेच अतिशय मोजक्‍या शब्दांत यथार्थपणे केलेली शब्दखेळी निश्‍चितच सहृदय अभिनंदनास पात्र आहे. "ग्राफिटी'कारांचे मनस्वी अभिनंदन!

- मनोहर ना. आंधळे, चाळीसगाव

हे विदर्भाच्या भूमीचं...


"सकाळ'ची ग्राफिटी लाजवाब!

"सकाळ'मध्ये प्रसिद्ध होणारी दररोजची ग्राफिटी म्हणजे रसिक वाचकांना एक अनमोल नजराणाच आहे. याबद्दल "सकाळ'ला शतश: धन्यवाद! रोज निरनिराळ्या विषयांवर ग्राफिटी इतकी चपखलपणे भाष्य करते की वा! लाजवाब! माझ्याप्रमाणे इतरही असंख्या रसिक वाचक ग्राफिटीची कात्रणे कापून सुविचाराप्रमाणे एका डायरीत चिकटवून एक संग्रहच करीत असणार. आतापर्यंतच्या ग्राफिटीपैकी शक्‍य होतील तेवढ्या ग्राफिटींचे पुनर्मुद्रण केलेलीे एखादी विशेष पुरवणी "सकाळ'ने प्रसिद्ध करावी. रसिकांच्या आनंदालापारावर राहणार नाही. ग्राफिटींचा संग्रह करणाऱ्या माझ्यासारख्यांना हा एक दुग्धशर्करा योगच ठरेल.

- सुरेश एस. राजे राधाकृष्णनगरी, यवतमाळ.

हे प्रेम कोल्हापूरचं...


"ग्राफिटी' विद्यार्थ्यांनाही उपयुक्त


"सकाळ'मधील "ग्राफिटी' सदर म्हणजे मोजक्‍याच; परंतु अर्थपूर्ण शब्दांत वाचकांना जीवनाची बरीच तत्त्वे सांगून त्यांच्या जगण्याला बळकटी प्राप्त करून देणारे "टॉनिक'च होय. नवोदित सूत्रसंचालक, निवेदक, कथाकार, वक्ते यांच्यासाठी, तर एक पर्वणीच होय. चूक करावी, परंतु तीही अचूक. "मी उन्हाळ्याचा फॅन आहे,' अशा मार्मिक शब्द प्रयोगातून ग्राफिटी जणू भाषा सौंदर्याला नवसंजीवनी देऊन "माय मराठीपण' जपण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही अशा वाक्‍यांचा संग्रह निबंध, भाषण यासाठी उपयुक्त आहे. "सकाळ' परिवाराने वाचकांच्या आग्रहास्तव ग्राफिटी पुस्तक प्रकाशित करून ज्ञानाचा प्रचंड खजिनाच उपलब्ध करून दिला. तो प्रत्येकाकडे असणे गरजेचेच आहे. एक उत्कृष्ट प्रबोधन कार्य, प्रभावी संदेश व प्रबळ जगण्याचे सौंदर्य या सर्वांचा सुंदर मिलाफ म्हणून "सकाळ'चे ग्राफिटी सदर महाराष्ट्रातील प्रत्येक वाचकाला भावणारे आहे.


-महेश घुगरे, महागाव (ता. गडहिंग्लज).
--------
आशयगर्भ "ग्राफिटी'
दैनिक "सकाळ'च्या "शिदोरी'मधील "ग्राफिटी' हा अल्पाक्षरी मजकूर अत्यंत आशयगर्भ असतो. रोज नवा विचार गुलाबकळ्यांवरच्या दवबिंदूसारखा लोभस असतो. कधी मनावरचे ताणतणाव कमी करणारा रंजक -रोचक; तर कधी जीवनाचे तत्त्व सांगणारा मार्गदर्शक. ग्राफिटी दोस्तासारखा वाटतो. रोजचा ग्राफिटी संग्रहणीय असून भेटकार्डावरून "भेट' म्हणून देण्यायोग्य आहे. शालेय विद्यार्थी, नवोदित वक्ते, सूत्रसंचालकांना हा मजकूर उपयुक्त आहे. ग्राफिटीमुळे "शिदोरी' रूचकर-अन्‌ खुसखुशीत झाली आहे. "सकाळ'च्या हजारो वाचकांना "ग्राफिटी' नक्कीच मनापासून भावते.
-किरण पाटील, बटकणंगले (ता. गडहिंग्लज).

हे ठाण्याचं...


ग्राफिटी भावते


हॅपी बर्थ डे टू यू "टुडे'! "सकाळ'चा वाचक म्हणून आम्हाला अभिमान आहे. "नवी मुंबई टुडे'मुळे त्यात अधिकच भर पडली. "टुडे'त सादर होणारे गुडमॉर्निंग सदर तर आमच्याकडे सारेच जण वाचतात. सकाळी पेपर आला की प्रथम आम्ही वाचतो ती ग्राफिटी...! अतिशय मार्मिक भाष्य असलेली ग्राफिटी सर्वांनाच भावते. "टुडे'तील बातम्या सर्वसमावेशक असतात. "टुडे'ला शुभेच्छा!


- मृणाल सावे, कळंबोली.

हे चोखंदळ पुणेकरांचं...


सलाम ग्राफिटी!


"सकाळ'ची प्रत्येक ग्राफिटी गहिरे रंग घेऊनच भेटीला येत असते. कधी उपहास तर कधी विरोधाभास, कधी रेशीमचिमटा तर कधी जाणवण्याएवढा धक्का. कधी समाजजीवनावर मार्मिक टिप्पणी करता करता वर्मावर नेमके बोट ठेवणारी, तर कधी मानवी प्रवृत्तीची अचूक नाडी ओळखणारी. कधी विनोदाचा शिडकावा, तर कधी ढोंगीपणावर प्रहार करणारी. वाचकाचे बोट धरून अलवार पावलांनी चालायला लावणारी, तर कधी चालता चालता पायाखालची वाटच काढून घेणारी. बोचरी, गंभीर, मिस्कील, खोडकर ही तिची रूपं विलोभनीय वाटतात. मोजक्‍याच शब्दांतून वैचारिक व भावनिक कल्लोळ निर्माण करत, शाश्‍वत सत्याला स्पर्श करत वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या ग्राफिटीला सलाम!


- प्रा. वामन बोरकर, पुणे.

हे `बेरकी' नगरकरांचं...




ग्राफिटीने मन जिंकले




"सकाळ'मधील "प्रसन्न' या सदरातील "ग्राफिटी'च्या प्रेमात आम्ही पडलो आहोत. महाराष्ट्रात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने "लोकांना डोक्‍यावर घेऊ नका, मान लचकेल', "दुसऱ्याचं भलं व्हावं म्हणून वाटते ती तळमळ, अन्‌ दुसऱ्याचं भलं झाल्यानंतर वाटते ती मळमळ' या दोन्ही ग्राफिटी संदर्भ साधून जनसामान्यांच्या डोक्‍यात प्रकाश टाकणाऱ्या आहेत. मोहक अक्षरांतून मोजक्‍या शब्दांत बोध देणाऱ्या ग्राफिटीला आमचे मनापासून धन्यवाद. "ग्राफिटी'चा हा "ग्राफ' असाच उंचावत जावो.




- डॉ. सी. एम. बोरा, सौ. कल्पना बोरा, राशीन